

JOURNEY TO SUCCESS
Success story of “Samruddhi Agro Group” (Gud2Eat) in food processing sector
(विशेषवृत्त/यशोगाथा dt 11 Nov 2022)
महाराष्ट्र शासनांकडून उत्कृष्ट ‘स्टार्टअप’ म्हणून राज्यपालांच्या हस्ते गौरव
ज्वारी, बाजरी व नाचणी या भरडधान्यापासून फक्त ‘भाकरी’ बनविता येते. या पारंपरिक गृहितकाला छेद देत या धान्यांपासून पोहे, चिवडा, रवा, इडली- डोसा पीठ, चकली, शंकरपाळे आदी विविध आरोग्यवर्धक पदार्थ बनविण्याचा उद्योग देवळाली प्रवरा (ता.राहूरी) येथे सुरू झाला आहे. आगळी-वेगळी संकल्पना घेऊन सुरू केलेल्या ‘देवळाली प्रवरा’ येथील सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांच्या ‘स्टार्टअप’च्या उत्पादनांनी सातासमुद्रापार भरारी घेतली असून महाराष्ट्र शासनाचा एक लाख रूपयांचा ‘उत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार’ ही राज्यपालांच्या हस्ते मिळाला आहे. यानिमित्ताने अहमदनगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने १५ ऑगस्ट २०२२ ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान राज्यात ‘महाराष्ट्र स्टार्टअप’ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तळागाळातील नवउद्योजकांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरवणे हा या ‘स्टार्टअप’ यात्रेचा उद्देश होता. या ‘स्टार्टअप’ यात्रेमध्ये महिला नवउद्योजक गटामध्ये सरोजिनी फडतरे यांच्या ‘मिलेट ट्रेडीशनल फुड फॉर हेल्थ’ (Millet traditional food for health) या संकल्पनेवर आधारित ‘स्टार्टअप’ उद्योगाला राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा एक लाख रूपयांचा पुरस्कार ही मिळाला. मुंबई येथे १८ ऑक्टोंबर २०२२ रोजी झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.
सरोजिनी तात्यासाहेब फडतरे, समृद्धी ऍग्रो ग्रुप, राहुरी.
देवळालीच्या महिला नवउद्योजिकेची सातासमुद्रापार भरारी !
श्रीमती फडतरे यांचा देवळाली प्रवरा येथे ही 'समृद्धी ऍग्रो ग्रुप' या नावाने धान्य प्रक्रिया उद्योग आहे. या उद्योगाच्या माध्यमातून ज्वारीचा रवा, पोहे, इडली मिक्स, ज्वारी चिवडा, बाजरी पोहे, नाचणी रवा, इडली व डोसा मिक्स, ज्वारी बाजरी नाचणीची पीठ आदी उत्पादने घेण्यात येतात. ही सर्व उत्पादनांची गुणवत्ता चांगली असल्याने त्यांना भारताबाहेर अमेरिका, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ही बाजारपेठ मिळाली आहे. आता मिश्रधान्यांचे ‘कुरकुरे’ उत्पादनही सुरु केले आहे.
ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या लागवडीपासून ते प्रक्रिया उद्योगाच्या या प्रवासात जिल्ह्यातील सेंद्रीय पध्दतीने शेती करणारे अनेक शेतकरी त्यांच्याशी जोडले गेले आहेत. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मॉडर्न पद्धतीने झटपट खाण्यासाठी ज्वारी, बाजरी आणि नाचणी पासून बनविलेल्या पदार्थांचे या उद्योगांतून मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. स्थानिक पातळीवर या पदार्थांच्या विक्रीसाठी देवळाली प्रवरा येथे ‘मॉल’ ही सुरू करण्यात आला आहे. ऑनलाईन विक्रीसाठी www.gud2eat.in या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘गुड टू इट’ या नावाने ब्रॅँड विकसित करण्यात आला आहे.
सरोजिनी फडतरे यांना या उद्योगात कृषी पदवीधर असलेले त्यांचे पती तात्यासाहेब फडतरे यांची ही मोलाची मदत होत आहे. श्रीमती फडतरे या स्वत: गृहविज्ञान शाखेच्या पदवीधर आहेत. आज पुण्यामध्ये १६३ ठिकाणी ज्वारीचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय मुंबई, नाशिक, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी उत्पादनांची विक्री होत आहे. महाराष्ट्राबाहेर एकूण अकरा ठिकाणी पदार्थांची विक्री होत आहे. अमेरिका, दुबई, स्पेन देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी त्यांचे नातेवाईक ज्वारी, बाजरी, नाचणीचे पदार्थ आवर्जून घेऊन जातात. त्यामुळे परदेशात पदार्थांची लोकप्रियता वाढली आहे.
राज्यभरातून मागणी वाढल्यामुळे दोराबजी, फूडप्लस, राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र, डायबेटिक ट्रॉमा सेंटरमध्ये ज्वारीचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परराज्यांतून मागणी वाढल्याने कुरिअरद्वारे माल पाठविला जातो. शहरातील नागरिकांना ज्वारी, बाजरी आणि नाचणीचे महत्त्व कळावे यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रक्रिया उद्योगातील प्रगतीमुळे त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचे दोन पुरस्कार मिळाले आहेत.
संसाराचा व्याप वाढल्याने गाव सोडले आणि थेट हैद्राबाद येथे ई टीव्हीच्या अन्नदाता या नियतकालिकात ते उपसंपादक म्हणून रूजू झाल. २००६ ते २००८ ह्या दोन वर्षात हैद्राबाद मधली भाषा आणि खाद्य संस्कृती यांचा मेळ काही बसेना. खूप दूर आल्यासारखी भावना सतत व्हायची. म्हणून तिथेही राजीनामा देऊन पुण्यात एक कृषीविषयक नियतकालिकात पतीनी उपसंपादक म्हणून काम सुरू केले.
येथूनच माझ्या आयुष्यात काही नविन करण्याचं पक्क केलं. मी २०१० साली घरूनच ज्वारी बाजरी नाचणी आणि गहू पिठांची विक्री सुरु केली. पिठाची डिलिव्हरी पती कामावर जाताना देत असतं.
पतीचे बचत गटांना प्रॉडक्ट बनवण्याचे आणि मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्याचे काम होते. ह्या कामात खूप ओळखी झाल्या. त्यांनी सात राज्यांचा जवळून अभ्यास करता आला..
सन २०१२ मध्ये संधी चालून आली. कृषी विभागाने भरडधान्य विकास कार्यक्रमाची योजना सुरू केली होती. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या धान्यांवर भरड प्रक्रिया करून विविध उत्पादनं तयार करण्याची कल्पना अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून पुढे आली आणि हे क्षेत्र नाविन्यपूर्ण असूनही यात व्यावसायिक संधी भरपूर निर्माण करता येतील अशी आशा पल्लवित झाली. विचारांती मी पूर्णपणें आणि पूर्णवेळ या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. वडापुरी ता. इंदापूर जि पुणे येथे दहा जणांचा बचतगट केला. आमचे , दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मगर साहेब यांचे मदतीने बचत गट स्थापन केला आणि माझ्या उद्योगाचा श्रीगणेशा झाला.
आमच्या कष्टाची पराकाष्ठा सुरू झाली. मी होम सायन्स पदवीधर असल्याने सर्व उत्पादनाचा प्रयोग आधी घरात होत असे. त्यात यश आल्यानंतर मोठ्या प्रमाणात ते करत असू. २०१२ मध्ये पुण्यात भरलेल्या कृषी प्रदर्शनात आमच्या उत्पादनांना विक्रीसाठी पहिले व्यासपीठ मिळाले. पण नोकरीचाच अनुभव गाठीशी असल्याने ग्राहकांपर्यंत पोहोचताच येईना. ही बाब कृषी अधिकारी अर्जुन फुले यांच्या लक्षात आली, त्यांनी पहिला धडा शिकवला. ग्राहकांनी काही घेवो किंवा न घेवो , त्यांना आपले प्रॉडक्ट देऊन धीटपणे संवाद साधायचा. झाले...मनाने ही हिय्या केला आणि पहिल्याच दिवशी नऊशे रुपयांची तर चार दिवसात साडे चार हजार रुपयांची विक्री झाली.
त्यानंतर आत्मविश्वास दुणावला आणि ग्राहकांचे जाळे प्रदर्शनाच्या माध्यमातून खूपच वाढले. त्यातूनच पुण्यातील एका महिलेने पन्नास जणांसाठी ज्वारीच्या इडलीची ऑर्डर दिली. ती सर्व इडली आम्ही घरी बनवून पोहोच केली आणि होम डिलिव्हरी चा टप्पा सुरु झाला. त्याच दरम्यान कोकणातील एक इडलीची ऑर्डर आली आणि आता कोकणात कशी द्यावी हा प्रश्न पडला. मग मी त्यांना म्हणालो की मी पीठ तयार करून देतो , तुम्ही ते भिजवून इडली तयार करा. अशा तऱ्हेने इडली मिक्स चा जन्म झाला. ग्राहकांची नाडी ओळखून प्रक्रियेचे पुढचे दालन खुले झाले.
आमच्या उद्योगाचे स्वरूप २०१३ मध्ये विस्तारले. देवळाली प्रवरा येथे ही 'समृद्धी ऍग्रो ग्रुप' या नावाने धान्य ग्रेडिंगचे युनिट सुरू केले. खरंतर ज्वारी , बाजरीच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणे सोपे नव्हते. पण उत्पादनांच्या विक्री बरोबरच नाचणीतील लोहामुळे मुलींमधील रक्तक्षय कमी होण्यास मदत होते, ज्वारी आणि बाजरीतील कर्करोग , मधुमेह प्रतिबंधात्मक गुणधर्म मी ग्राहकांना पटवून देत होतो. आरोग्यदायी अन्नाची संकल्पना लोकांमध्ये रुजवण्यास सुरुवात केली.
आमच्या कामाची वाखाणणीही समाजात होण्यास लगेचच सुरुवात झाली. २०१३ मध्येच आम्हाला सहयाद्री वाहिनीचा नवउद्योजकांचा पुरस्कार मिळाला आणि प्रथमच दूरचित्रवाणी वर झळकलो. पैशांपेक्षा प्रसिद्धी खूप लवकर मिळाली. २०१५ मध्ये आमच्या उत्पादनांचा संपूर्ण भारतातून दुसरा क्रमांक आला. २०१९ मध्ये ऍग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले. असे अनेक पुरस्कार मिळाले.
ऑक्टोबर 2022, महाराष्ट्र राज्य पातळीवर स्टार्टअप यात्रा शेती मध्ये काम करणाऱ्या प्रथम पारितोषिक महिला म्हणुन एक लाख रु सन्मान चिन्ह असा पुरस्कार राज्याचे महामहीम राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात आल्या.
आमची उत्पादने जसे ज्वारीचा रवा, पोहे, इडली मिक्स, ज्वारी चिवडा, बाजरी पोहे, नाचणी रवा, इडली व डोसा मिक्स, ज्वारी बाजरी नाचणीची पिठं यांची गुणवत्ता सर्व निकषांच्या कसोटीवर उतरली आणि त्यांना भारताबाहेरही जसं की अमेरिका, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ही बाजारपेठ मिळवली आहे. आता मिश्रधान्यांचे कुरकुरे ही सुरुकेले आहेत.
आमचा दिवस भल्या पहाटे सुरू होऊन रात्री उशिरा मावळतो. सर्वांचे कष्टच मला खरंतर समृद्धीकडे घेऊन आले. सरोजबरोबरच आमच्या वेलीवर आलेली दोन फुलं , माझ्या दोन्ही कन्या ह्यांनी ही त्यांचं बालपण आमच्या फरफटीत घालवले. चिकाटी आणि जोखीम पत्करण्याची तयारी, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि मित्रांच्या शुभेच्छा असल्याने मानहानी, संयमाची परीक्षा पाहणाऱ्या कटू प्रसंगातही एकमेकांना सांभाळत आमच्या बरोबरच ज्वारीलाही समृद्धीचे दिवस आणण्यात आम्ही यशस्वी झालो. शून्यातून उभा केलेला हा प्रकल्प आता दिमाखाने आपली ध्वज पताका परदेशातही मिरवत आहे.